Last Updated: Thursday 2nd July 2026 04:31:41 PM
मुंबई: (दि.२जुलै २०२६)
राज्य शासनाने नुकतेच जाहीर केलेले 'महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६' तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यासंबंधीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे सचिव रविराज फल्ले यांनी जारी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २७ (२) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १२ जून २०२६ रोजीच्या शासन राजपत्रात 'महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६' प्रसिद्ध केले होते. मात्र, आता मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानंतर या नियमांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे.
राज्य माहिती आयोगाच्या मुख्यालयातून दिनांक २ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या पत्रानुसार, मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या सर्व महसुली विभागांच्या राज्य माहिती आयुक्तांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. आपल्या महसुली विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक प्राधिकरणांच्या ही बाब तात्काळ निदर्शनास आणून द्यावी, अशा सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.