Last Updated: Monday 19th July 2021 09:51:26 AM
दैव ज्याचे दुःखी होता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
वाशिम (दिनांक: 19 जुलै) मानोरा तालुक्यातील गादेगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री. विवेकानंद परशराम गावंडे यांनी त्यांच्या मृत पत्नीला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. व्यक्ती मृत्यू पावल्यावर ठरलेले विधी तर सर्वचजण करतात. परंतु विवेकानंद गावंडे यांच्या कृतीने समाजापुढे एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
गादेगाव येथील श्री.विवेकानंद परशराम गावंडे ह्याच्या पत्नीचे अनपेक्षितपणे ह्रदय विकारामुळे दिनांक 2 जुलै 2021 रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नीच्या निधनामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांना सात महिन्याचं लहान बाळही आहे.
या ओढवलेल्या संकटाने खचून न जाता आपल्या पत्नीच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून त्यांनी आज गादेगाव येथे रक्तदान यज्ञाचे आयोजन केले. तमाम तीस रक्तदात्यानी रक्तदान करून या श्रध्दांजलीरुपी रक्तदान यज्ञास आपले योगदान दिले. सातजन्मी तोच नवरा मिळावा म्हणून स्रिया वटपौर्णिमा करतात. परंतु अर्ध्यावरती डाव सोडून गेलेल्या आपल्या पत्नीच्या आत्म्यास चिरशांती मिळावी म्हणून केलेले रक्तदान यज्ञ खरोखरच अभिनंदनास पात्र आहे.