Last Updated: Tuesday 24th August 2021 10:51:36 AM
मुंबई, दि.२४ : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांना देण्यात येणारा निधी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित देण्यात येणार आहे.बंजारा समाजाची लोकसंख्या जास्त आहे अशा बंजाराबहुल ११ जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजातील व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली अशासकीय समिती स्थापन करण्यात येणार असून तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा समावेश करण्यात आला आहे या सभागृह बांधकामासाठी तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित निधी देण्यात येणार आहे अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
श्री.वडेट्टीवार म्हणाले, तांडा वस्ती सुधार योजनेसाठी यापूर्वी दिला जाणारा निधी मर्यादित आहे. तांडा वस्तींची लोकंसख्या हा मुद्दा लक्षात घेतला जात नसल्यामुळे विकासकामे करताना अडचणी येत आहेत त्यामुळे या समाजातील प्रतिनिधींनी तांडावस्ती सुधार योजनेमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केली होती.त्यानुसार तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत आता १०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला १५ लाख रूपये, १०० ते १५० लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २० लाख रूपये तर १५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २५ लाख रूपये निधीचे वितरण करण्यात येणार आहे.
बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे.मात्र बंजाराबहुल लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात बंजारा समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पालकमंत्री यांच्याऐवजी त्या समाजातील व्यक्तीची नियुक्ती व्हावी अशी बंजारा समाजाची मागणी होती. बंजाराबहुल समाज असलेले बुलढाणा,यवतमाळ, नांदेड, जालना, परभणी, बीड, सोलापूर, औरंगाबाद, लातुर, हिंगोली,वाशिम हे अकरा जिल्हे आहेत.या जिल्ह्यात बंजारा समाजाची जिल्हास्तरीय समिती करून बंजारा समाजाचे प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत.
तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये लोकसंख्येवर आधारित कामांमध्ये संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह या नावाने नवीन कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.तांडा वस्तीच्या लोकसंख्येवर आधारित सभागृह बांधण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.१०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला १५ लाख रूपये, १०० ते १५० लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २० लाख रूपये तर १५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तांडा वस्तीला २५ लाख रूपये निधीचे सभागृह बांधण्याकरिता निधीचे वितरण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.वडेट्टीवार माहिती देताना म्हणाले.
(Source: महासंवाद)