Last Updated: Friday 12th August 2022 12:00:00 PM
मुंबई, दि. 12 (रानिआ) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75. धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 02. बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 व लोणार- 02. अकोला: अकोट- 07 व बाळापूर- 01. वाशिम : कारंजा- 04. अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 व चांदुर रेल्वे – 01. यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 व झरी जामणी- 08. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, व देगलूर- 01. हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 व पालम- 04. नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17. पुणे: जुन्नर – 38, आंबेगाव – 18, खेड- 05 व भोर – 02. अहमदनगर: अकोले – 45. लातूर: अहमदपूर – 01. सातारा: वाई- 01 व सातारा – 08 व कोल्हापूर : कागल – 01. एकूण: 608
(Jagdish More, SEC)
(source:महासंवाद)