Last Updated: Thursday 27th April 2023 07:03:12 PM
मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने दिनांक १ मे २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ७.१५ ते ९ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ७.१५ वाजेपूर्वी किंवा ९ वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे राज्यपाल हे प्रमुख कार्यक्रमास उपस्थित राहून ध्वजारोहण करतील. तर विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित तहसिलदार हे तालुका मुख्यालयी ध्वजारोहण करतील.
राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. त्यानंतर ‘राज्यगीत’ म्हणण्यात/ वाजविण्यात यावे. ध्वजारोहण समारंभाचे अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी / अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे किंवा नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९१/(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर, १९९१ तसेच क्रमांक एफएलजी-१०९८/(ध्वजसंहिता)/३०, दिनांक ११ मार्च, १९९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख महाराष्ट्र दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हे परिपत्रक शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.