Last Updated: Tuesday 30th November 2021 10:36:29 PM
मुंबई, दि. २९ : थंडी, ऊन, वारा, पाऊस असला तरीही कमी मानधनावर काम करणाऱ्या राज्यातील ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिले होते. याबाबत महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपयाची वाढ केली आहे. मानधनवाढीचा लाभ राज्यातील ५०० हून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकांना मिळणार असून या व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत.
३ हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये महावितरण कंपनीकडून काही सेवा पुरविण्यासाठी फ्रान्चायझी तत्त्वावर ग्राम विद्युत व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. कामाच्या तुलनेत मानधन कमी असल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती.
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि ग्राम विद्युत व्यवस्थापक यांची मुंबई येथे संयुक्त बैठक घेवून मानधनात वाढ करण्याचे निर्देश महावितरण कंपनीला दिले. त्यानंतर महावितरण कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेऊन विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या कामाचे स्वरूप पाहून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कंपनीच्या कार्यालयामध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व मागण्यांचा गाभीर्यपूर्वक विचार करुन मानधनात वाढ केली, त्याबद्दल ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे ग्राम विद्युत व्यवस्थापक अण्णासाहेब चौभे, महेश तुपे व इतर ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी आभार व्यक्त केले आहे.
(source: महासंवाद)