Last Updated: Saturday 16th March 2024 07:27:04 PM
नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक पार पडणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या २६ जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
(sorce:महासंवाद)