Last Updated: Wednesday 17th May 2023 08:15:33 PM
मुंबई,दि.१५ : महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात येणार असून ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांना आपल्या कार्यअहवालासह शनिवार दि. २० मे पर्यंत अर्ज स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये करावयाचा आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी बालविवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यासारख्या क्षेत्रात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला असावा.
पुरस्कार निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी समन्वयाने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम योग्य पदधतीने राबविण्याची दक्षता घ्यावी, तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकारी व संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबवावा. ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येत आहे. याबाबतचाच महिला व बालविकास विभागाचा शासननिर्णय दिनांक ९ मे २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
००००
(source: महासंवाद)